पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. यामुळे दर्शन घेण्यासाठी लागणारा वेळ अनेक वेळा वाढतो. यावरचा उपाय म्हणून मंदिर समितीने टोकन दर्शन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा शुभारंभ रविवारी (दि. 15) श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे करण्यात आला.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यात सहा स्लॉटमध्ये प्रतिस्लॉटमध्ये 200 याप्रमाणे एकूण 1200 भाविकांना रोज दर्शनाचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. या टोकन पद्धतीमुळे भाविकांना अर्धा ते एक तासाच्या आत दर्शन मिळेल, असे औसेकर महाराजांनी स्पष्ट केले.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, बलभिम पावले, संजय कोकीळ, राजाराम ढगे, शंकर मदने, राजेंद्र घागरे उपस्थित होते.
औसेकर महाराजांनी सांगितले की, मंदिर समितीने वारकरी आणि भाविकांना मदत करण्यासाठी सर्व आवश्यक सोई उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या चाचणीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. टोकन दर्शन प्रणालीच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने बुकींगची सुविधा उपलब्ध आहे. भविष्यात ऑफलाईन बुकींगची सुविधा देखील उपलब्ध होईल. टोकन दर्शनासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच दर्शनहॉल व स्कायवॉक लवकरच तयार केले जाणार आहे, असे औसेकर महाराजांनी सांगितले.
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबत माहिती दिली की, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने टोकन दर्शन प्रणालीसाठी संगणक प्रणाली मोफत विकसित केली आहे. वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे दर्शन रांगेत योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.दर्शनासाठी टोकन घेऊन आलेल्या वारकरी भाविकांचे मंदिर समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल अशा जयघोषात दर्शन रांगेत प्रवेश केला. पूर्वी 7 ते 8 तास लागणारा वेळ आता टोकन दर्शनामुळे कमी होऊन अर्धा ते एक तास झाला आहे. भाविकांनी टोकन दर्शन पद्धतीचे स्वागत केले आहे.
यामुळे भाविकांचे समाधान वाढले असून, मंदिर समितीच्या या निर्णयामुळे त्यांना जलद व सुलभ दर्शन मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
भाविकांना केंद्रबिंदू माणून जलद व सुलभ दर्शन देण्याचा प्रयत्न आहे. याकरीता टोकन दर्शन प्रणाली चाचणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. 1200 भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन मिळत आहे. ही टोकन दर्शनाची चाचणी 26 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर आषाढीसाठी होणारी गर्दी पाहता टोकन दर्शन सुरु ठेवायचे का, याबाबत निर्णय घेतला जाईल.- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष मंदिर समिती
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहा जुलैला सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शनाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सद्या मंदिर समितीकडून 15 जूनपासून टोकन दर्शन प्रणाली चाचणी सुरु केली आहे.