सोलापूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चून कॉरिडॉर करण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यांत म्हणजे जुलैअखेरपर्यंत कॉरिडॉरसाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण केले जाणार आहे. भूसंपादनासाठी सुमारे 1800 कोटी रुपये लागणार असून, यातील 30 टक्के म्हणजे 700 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पंढरपूर कॉरिडॉरचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मध्यंतरी निवडणुकांमुळे हे काम रखडले होते. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी यापूर्वीच भूसंपादन करण्यात येणार होते. मात्र निवडणुकीमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. कॉरिडॉर प्रकल्पासाठी नागरिकांशी संवाद सुरु आहे. समन्वयातून यासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. बहुतांश बाधितांची यासाठी कोणतीही अडचण नाही. राज्य शासनाकडूनही यासाठी निधीची तरतूद करण्यात येत असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सात रस्त्यांसाठी 493 कोटींचा निधी
पंढरपूर शहरालगतच्या सात रस्त्यांच्या बांधणीसाठी राज्य शासनाने बांधकाम विभागाकडे 493 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे या निधीतूनही याठिकाणी कामे सुरु होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले.
पाच पालखी तळांसाठी 100 कोटी
पंढरपूर शहरातील पालखी स्थळांच्या विकासकामांसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. या निधीतून आवश्यक सुविधा याठिकाणी उभारण्यात येत आहेत. यातून पालखी तळावर वारी काळात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न राहणार आहे. वाखरी, 65 एकर, 50 एकर, भंडीशेगाव, पिराची कुरोली या पाच ठिकाणच्या पालखी तळाचा विकास केला जाणार आहे. प्रत्येक पालखी तळासाठी 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.