सोलापूर : इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे परिवहन महामंडळाचा आर्थिक भार वाढत असल्याने डिझेल बचतीसाठी लालपरीच्या प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. इंधनची बचत म्हणजेच इंधनाची निर्मिती या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेलची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. या उपक्रमात उत्कृष्ट मायलेज देणाऱ्या चालकांना विशेष भत्ता व पुरस्कार तसेच आगारांनाही आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.
लालपरीच्या खर्चामध्ये इंधन खर्चाचा वाटा अधिक असल्याने डिझेल बचतीवरच आता भर देण्यात येत आहे. सर्वच आगारांना डिझेल बचतीची उद्दिष्टे दिली असून त्याचा नियमित आढावा घेतला जात आहे.
चालकांच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीचा बसच्या मायलेजवर परिणाम होत असतो. किलोमीटर प्रतिलिटर (केपीएल) असलेल्या चालकांचे समुपदेशन व पुनर्प्रशिक्षण दिली जाणार आहे. वेगावर नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू न ठेवणे व ब्रेकचा सुयोग्य वापर यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.
डिझेलची बचत करताना त्याचा प्रत्येक थेंब वाचवणे म्हणजेच राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण केल्यासारखे आहे. अधिकारी, कर्मचारी व बस चालकांनी जबाबदारीने काम केल्यास ही बचत भविष्यात लालपरीसाठी मोठी ताकद ठरू शकते.- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक, सोलापूर