कुर्डूवाडीत अडचणीचा रस्ता झाला मोकळा 
सोलापूर

Solapur News : कुर्डूवाडीत अडचणीचा रस्ता झाला मोकळा

नगरपालिकेने माढा रस्त्यावरील अतिक्रमण हटविले; वाहतूक सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

कुर्डूवाडी : येथील नगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने बालोद्यान ते नगरपालिका कार्यालयापर्यंत माढा रोडवर असलेली अतिक्रमणे काढल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. विस्थापित झालेल्या लोकांसाठी नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

कुर्डूवाडी शहरामध्ये भाजी मंडई आझाद मैदानावर भरते परंतु सर्व भाजी विक्रेते रेल्वे स्टेशन समोरील रोडवर बसतात. भाजी मंडईत गाडीवरून उतरून जाऊन भाजी खरेदी करणे जिकरीचे होते, रस्त्यावर खरेदी करणे सोयीचे असते म्हणून ग्राहकही रस्त्यावरील भाजी खरेदीला प्राधान्य देत होते, यामुळे भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली होती. त्यांच्या सोबत चिकन व मासे विक्रेतेही सोबत होतेच. स्टेशन रोड परिसरातच खरेदी विक्रीला ग्राहक जास्त येत असल्यामुळे विक्रेतेही येथेच आपली दुकाने थाटतात आझाद मैदानावर भाजी विकणारे विक्रेतेही तेथील जागा सोडून तेही रस्त्यावर येऊन भाजी विकू लागले. त्यामूळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती.

या भाजी मंडईजवळच नव्याने रेल्वे स्थानक बांधण्यात आले आहे. या स्थानकाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. स्थानकामूळे प्रवाशांची येथे मोठी वर्दळ वाढणार आहे. रेल्वे गेटच्या प्रवेशद्वारातच अस्ताव्यस्त भाजी मंडईची गर्दी पाहून कुर्डूवाडी शहराबद्दल तिरस्काराची भावना परगावच्या प्रवाशात .निर्माण होऊ शकत होती. सध्या स्टेशन रोड परिसरात वाहतूकीला अडथळा होऊ लागला होता. दोन्हीकडील विक्रेते व ग्राहक यांच्या मधून रस्त्यावर एक चार चाकी गाडी सुद्धा जाणे मुश्किल होऊ लागले होते. कित्येक दिवस कुर्डूवाडी तील प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत होता. अतिक्रमण हटविल्याने हा रस्ता आता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT