सोलापूर : परिवहन महामंडळाच्या विभागीय प्रशासनाकडून कोल्हापुरच्या उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचपर्यंत एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला असून आज शनिवार रोजी सकाळी सहा वाजता ती येथील प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. पुन्हा सायंकाळी सहा वाजता ती सोलापूरच्या दिशेने धावणार असून रात्री साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत येथे पोहोचेल. यासाठी वाढीव दर न आकारता 423 रूपयेच तिकीट ठेवण्यात आले आहे.
यावेळी विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी सकाळी सहा वाजता या बसची पूजा केली. वरिष्ठ आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लिकार्जुन अंजुटगी, आगार व्यवस्थापक नागेश जाधव, विभागीय वाहतूक निरीक्षक परशुराम नकाते, विभागीय अभियंता चौधरी, शीतल बिराजदार, बाळासाहेब वाघमारे, उमा गव्हाणे यांच्यासह चालक व वाहक उपस्थित होते. ही बस सोलापूरच्या स्थानकावरून सुटून ती मंगळवेढा-सांगोला-मिरजमार्गे कोल्हापूरच्या बसस्थानकातून थेट टाऊन हॉल (उच्च न्यायालय) पर्यंत प्रवाशांना घेऊन पोहोचणार आहे. ती बस सायंकाळी सहा वाजता तेथील मुख्य बसस्थानकातून निघून टाऊन हॉल (उच्च न्यायालय) ला येईल. नंतर ती पुढे सोलापूरकडे निघेल.
न्यायालयीन कामकाजासाठी येथून नियमित वादी व प्रतिवादीसह विधिज्ञांना कोल्हापूरला जावे लागते. यांच्यासाठी ही बस सुरू केली असून यासाठी कोणतीही वाढीव दराची आकारणी केली नाही. न्यायालयीन कामाच्या वेळेत ती तेथे पोहोचून पुन्हा काम उरकून सायंकाळी सोलापूरला येता येणार आहे.- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक