सोलापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील श्री स्वामी समर्थ महिला दूध उत्पादक संस्थेस दूध संकलनासह सेवा केंद्र म्हणून मान्यता दिली. सोलापूर जिल्ह्यातील हे पहिलेच सेंटर ठरले आहे. कोल्हापूरच्या दूध उत्पादकांना जो दर व ज्या सुविधा दिल्या जातात त्या सर्व सुविधा विंचूरच्याही दूध उत्पादकाना दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघ अडचणीत आहे. या संघाकडून उत्पादकांना दिलासादायक दर मिळत नाही. खासगी उद्योग पशुपालकांची दराबाबत पिळवणूक करतात. यामुळे त्रस्त असलेले सोलापूर जिल्ह्यातील पशुपालक गोकुळ दूध संस्थेस मोठ्याप्रमाणावर दूध घालू शकतात. गोकुळ संस्थेने सोलापूर जिल्ह्यात विस्तारण्यास आता आरंभ केल्यामुळे जिल्ह्याच्या दूध उद्योगास बुस्टर डोस मिळणार आहे. पशुपालक मोठ्याप्रमाणावर या व्यवसायाकडे वळू शकतात, अशी सद्यस्थिती आहे. यास श्री समर्थ महिला दूध संस्थेचे सचिव बाळासाहेब पाटील यांनी दुजोरा दिला.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुभती गाय व म्हैस घेण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाणार
दुभती गाय, म्हैस विकत घेण्यासाठी नोंदणीकृत दूध उत्पादक संस्थेच्या मध्यस्थीने किमान पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य गोकुळ देणार
दुभत्या जनावरांना लागणारी औषधे, त्याच्या खर्चापोटी किमान 25 टक्केची सूट मिळणार
म्हशीच्या दुधाला प्रति फॅटला साडे नऊ रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता
अधिक चांगल्या फॅटच्या दुधाला प्रति लिटर 55 ते 60 रुपयांचा दर मिळणार
कोल्हापूरच्या पशुपालकांना गोकुळकडून सोयीसुविधा दिल्या जातात त्या सर्व सोलापूरकरांना मिळणार
गोकुळने स्वनिर्मित पशुखाद्याचे दर प्रति बॅग पन्नास रुपयांनी कमी केले आहेत. त्या दरानेच विंचूरच्या पशुपालकांना पशुखाद्य उपलब्ध होणार आहे. याशिवाय कोल्हापूरच्या धर्तीवर दरवर्षी बोनसही मिळणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना भीमा खोऱ्यासह सर्वच शेतकऱ्यांसाठी गोकुळने ही एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे.- सारिका पाटील, अध्यक्षा, स्वामी समर्थ महिला दूध उत्पादक संस्था विंचूर