केम : कुंकू निर्मिती कारखान्यात हळद, स्टार्च पावडर व रंगाची यंत्रात मिसळण करताना कामगार. 
सोलापूर

Solapur News : मंदिर, देव कोणतेही असो, कुंकू मात्र केमचेच...

दररोज होते 80 टनपर्यंत हळदी-कुंकूची निर्मिती; देशभरात पुरवठा

पुढारी वृत्तसेवा

श्रीनिवास बागडे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम हे गाव कुंकू उत्पादनासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. येथे दररोज 70 ते 80 टनपर्यंत हळदी - कुंकूची निर्मिती केली जाते. हा कुंकू देशभरात पाठवला जातो. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 200 ते 235 कोटींपेक्षा अधिक आहे. यामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

केम हे देशातील कुंकू निर्मितीचे प्रमुख केंद्र मानले जाते. तिथे अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. रोज 70 ते 80 टन हळदी कुंकू, रांगोळी, बुक्का आणि अष्टगंधाची निर्मिती केली जाते. नवरात्र, वटपौर्णिमा, गौराई, लक्ष्मीपूजन अशा सणांच्या काळात केमच्या कुंकूला खूप मोठी मागणी असते. या उद्योगामुळे शेकडो कामगारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. ‌‘जिथं मंदिर, तिथं केमचं कुंकू‌’ असे म्हटले जाते, कारण येथून तयार झालेला कुंकू देशभरातील बाजारात पाठवला जातो.

करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंचोके पावडर, स्टार्च पावडर आदी वापरले जाते. येथील कुंकू दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, जयपूर, उज्जैन, पटना, वैष्णोदेवी, केरळ आदी ठिकाणी जात असतो. गावाने कुंकू निर्मितीच्या उद्योगामुळे चांगली प्रगती केलेली आहे; बेरोजगारीवर यशस्वी मात केली आहे. येथील कुंकवाचे दर वीस रुपये किलोपासून ते दीडशे रुपये किलोपर्यंत आहेत. त्याच्या प्रतवारीनुसार हे भाव ठरवलेले आहेत. केम गावात कुंकू निर्मितीचे एकूण 20 कारखाने असून मिळून साधारण 250 कामगार आहेत. एका कारखान्यात दोन मजुरांपासून दहा मजुरांपर्यंत माणसे काम करतात.

सध्या युद्धामुळे कच्च्या मालाचा तुटवडा भासत असल्याने केम गावात रोज चाळीस ते पन्नास टन हळदी कुंकू निर्मिती केली जात आहे. केममधील काही व्यावसायिकांनी त्यांच्या सोयीनुसार पंढरपूर, टेंभुर्णी, पुणे अशा ठिकाणीही कुंकवाची कारखानदारी सुरू केली आहे.

कपाळाच्या कुंकूचे निष्कर्षही

मूर्तींना लावण्यासाठी कुंकू हे देवळातील श्रध्देचे घटक मानले जाते. स्त्रीच्या सौभाग्याचे लेणं म्हणून याला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. यातून एक वैज्ञानिक निष्कर्षही आहे. कपाळावर लावलेले कुंकू शीतलता देते, एकाग्रता निर्माण करते, संयमी ठेवते.

केममध्ये विविध रंगाच्या कुंकवाची निर्मिती

केशरी, लाल, लाल-गुलाबी अशा रंगाचे कुंकू तयार होते. दक्षिणेतून चॉकलेटी कुंकवाचीही मागणी आहे. अयोध्येत श्री राम मंदिर निर्माण झाले, त्यावेळी पुजेला केममधून 50 किलो कुंकू मागविण्यात आला होता. त्याठिकाणी कुंकू निर्मितीचे केम म्हणून सर्वांना परिचित आहे.

कुंकू निर्मितीची परंपरा तीनशेहून अधिक वर्षांची

गावची कुंकू निर्मितीची परंपरा तीनशेहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. गावकऱ्यांनी त्यावेळी कुंकू निर्मितीचा शोध हळकुंडे, टाकणखार आणि लिंबाचा रस यांचा योग्य उपयोग करून लावला. अलीकडील काळात लिंबू किंवा इतर पदार्थांतील घटक असणारे रंग-गंध यासाठी विविध कंपन्यांचे डबे उपलब्ध आहेत. ते या कुंकू निर्मितीच्या कामात वापरले जातात (उदाहरणार्थ, सायट्रिक ॲसिड). विविध रंगांची रांगोळी, गुलाल, बुक्का, अष्टगंध आदी निर्मितीही गावातून होते.

कुंकू निर्मितीत वापरले जाणाऱ्या रंगांची निर्मिती मुंबईसह काही शहरात होतो. सध्या सुरु असलेल्या युध्दामुळे कच्च्या मालाचा तुडवडा आहे. त्यामूळे रंगांचे दर वाढले आहेत.
-आप्पा वैद्य, कुंकू उत्पादक केम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT