महूद : पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील कासाळ ओढ्याला पाणी आल्याने यावरील गावठाण बंधार्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे या ओढ्यावर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नळ्या टाकून तयार केलेला पूल पाण्याखाली गेला आहे. रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गाव दोन भागात विभागले गेले आहे. गार्डी ते भाळवणीकडे जाणार्या विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना, दूध उत्पादकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
गार्डी ते भाळवणी हे सुमारे सात किलोमीटर अंतर आहे. गार्डी परिसरातील असंख्य विद्यार्थी भाळवणी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जातात. कोरोना काळाच्या अगोदर पर्यंत हे विद्यार्थी गावठाण बंधार्यावरून असलेल्या रस्त्याने भाळवणीकडे जात होते. कोरोना नंतरच्या काळात झालेल्या मुसळधार पावसात या गावठाण बंधार्याच्या भरावाकडील दोन्ही बाजू मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्या. त्यामुळे या गावठाण बंधार्यावरून भाळवणीकडे ये-जा करणे बंद झाले. बंधार्यावरून जाणारा रस्ता वाहून गेल्यामुळे गार्डी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून कासाळ ओढ्यावर नळ्या टाकून तात्पुरता पूल बांधला.
आतापर्यंत विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी, दूध उत्पादक हे याच रस्त्याने गार्डी ते भाळवणी प्रवास करत होते. गेले अनेक वर्ष नादुरुस्त असलेला गावठाण बंधारा मध्ये सिमेंट पडद्याभरून दुरुस्त करण्यात आला. मात्र, बाजूच्या खचलेला भरावा भरण्यात आला नाही. बंधार्यामध्ये सिमेंट पडद्या करण्यात आल्याने बंधार्यात मोठ्या प्रमाणावर पाणी अडवले गेले आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नळ्या टाकून केलेला तात्पुरता पूल पाण्याखाली गेला आहे. गार्डी ते भाळवणी जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास करणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुलाची मागणी करूनही प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नसून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सोमवारपासून शाळा सुरु होणार असून, शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. प्रशासकीय यंत्रणेने लवकरात लवकर यावर मार्ग काढून गार्डी-भाळवणी रस्ता सुरू करावा, ही मागणी होत आहे.
गार्डी ते भाळवणी मार्गावरील कासाळ ओढ्यावरच्या छोट्या पुलावर पाणी आल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. प्रशासनाने यासाठी तत्काळ तोडगा काढावा. या ठिकाणी मंजूर असलेल्या पुलाचे काम लवकर करण्यात यावे.- शिवकुमार फाटे, सरपंच, गार्डी