Karmala Farm Laborer Death Pudhari
सोलापूर

Electrocution Death Solapur | तुटलेल्या वीजतारेला स्पर्श; गुळसडी येथील शेतमजुराचा मृत्यू

आठ-दहा दिवसांपासून तुटलेल्या तारांची माहिती देऊनही दखल न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Karmala Farm Laborer Death

करमाळा : महावितरणच्या तुटलेल्या वीजतारेला स्पर्श झाल्याने करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील विजय वसंत क्षीरसागर (वय ६०) यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १३) दुपारी दोन ते सव्वादोनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

विजय क्षीरसागर हे गुळसडी-पांडे रस्त्यालगत हनुमंत उद्धव पाटील यांच्या उसाच्या शेतात फवारणीचे काम करत होते. यावेळी शेतात तुटून पडलेल्या महावितरणच्या उघड्या वीजतारेला त्यांच्या पायांचा स्पर्श झाला. त्यातून विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गुळसडी येथील युवकांनी तातडीने महावितरण आणि करमाळा पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर महावितरणच्या वायरमनने घटनास्थळी येऊन वीजपुरवठा खंडित केला. करमाळा पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरू केली.

आठ-दहा दिवसांपासून तुटलेली तार

संबंधित वीजतार तब्बल आठ ते दहा दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत होती. याबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

शेतामध्ये तुटलेल्या वीजतारा पडलेल्या असताना त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी तसेच मृत विजय क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांना शासन व महावितरणकडून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT