सोलापूर

Solapur News : पाणवठे आटल्याने पक्ष्यांचे जगणे कठीण

पाणी, खाद्य आणि निवाऱ्याच्या शोधात पक्ष्यांचे स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : यंदा संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने नद्या, ओढे, नाले, तलाव आणि जलाशय कोरडे पडले आहेत. याचा फटका केवळ मानव आणि पशुधनालाच नव्हे, तर पक्ष्यांनाही बसत आहे.

पाणी आणि खाद्याच्या तीव्र टंचाईमुळे पक्ष्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, त्यांच्या राहणीमानासह स्थलांतर आणि प्रजननावरही विपरीत परिणाम होत आहे. अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी पाणवठ्यांच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. दुष्काळामुळे जलस्रोत आटल्याने जलवनस्पती, शैवाल, कीटक आणि जलचरांची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी, पक्ष्यांच्या नैसर्गिक खाद्यसाखळीवर परिणाम झाला असून, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणवठे कोरडे पडल्याने स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी पाणी आणि खाद्याच्या शोधात पाण्याची उपलब्धता असलेल्या भागांकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे काही भागांतील पक्ष्यांची संख्या घटत असून, स्थानिक परिसंस्थेचे संतुलनही बिघडत आहे. पक्ष्यांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण आणि पुरेसे खाद्य आवश्यक असते. मात्र, दुष्काळामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत अनेक पक्षी अंडी घालणे टाळतात. काही पक्ष्यांनी अंडी घातली तरी खाद्याच्या कमतरतेमुळे पिल्लांचे योग्य संगोपन करणे कठीण होते. परिणामी, पिल्लांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT