करमाळा : येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना मनोजकुमार राऊत यांच्या ‘दारू सोडा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा’ या सुरु केलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने सहभाग घेऊन गौंडरे येथील उमराव अंबारे यांनी आपले अनेक वर्षाचे दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला. अंबारे यांचा मुलगा राहुल यांनीही वडिलांच्या निर्धाराचा व राऊतांच्या शब्दाचा मान ठेवून संघर्ष केला व खाकी वर्दीला गवसली घातली.
करमाळा येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना मनोजकुमार राऊत यांनी नोकरीच्या चाकोरी बाहेर जाऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. विद्यार्थ्यांना बालवयातच शास्त्रज्ञ, त्यांची नावे, त्यांनी लावलेले शोध माहीत व्हावेत व दररोज डोळ्यासमोर राहावे, यासाठी त्यांनी सायन्स वॉल व शास्त्रज्ञांची जयंती उपक्रम सुरू केला होता. मनोजकुमार राऊत यांच्या सायन्स वॉलची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत याचा उल्लेख करून कौतुक केले होते, तर प्रत्यक्ष शाळेवर येऊनदेखील पहाणी केली होती.
तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबातील पालकांना दारूचे व्यसन असते व या व्यसनामुळे कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो. हे लक्षात घेऊन राऊत यांनी ‘दारू सोडा पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा’ हा उपक्रम सुरू केला होता.
या प्रयोगाने गौंडरे, ता. करमाळा येथील एका कुटुंबाचे अक्षरशः सोने केले. उमराव अंबारे यांनी घेतलेली शपथ आणि आज त्यांचा मुलगा पोलिस होणे, हा प्रवास खरोखरच डोळ्यात अंजन घालणारा आहे. एका अधिकाऱ्याच्या कल्पकतेमुळे एका कुटुंबाचे नशीब पूर्णपणे बदलू शकते, हे या घटनेने सिद्ध केले आहे.