करमाळा : कंदर (ता. करमाळा) येथील प्राचीन महादेव मंदिर व श्रीराम मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप यांनी केली आहे. या मागणीनुसार नाईक यांनी संबंधित अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश दिले आहेत.
करमाळा तालुक्यातील कंदर हे ऐतिहासिक गाव आहे. टेंभुर्णी-नगर मार्गावरील या गावात सुमारे 500 वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शैलीतील भगवान महादेव मंदिर व प्रभू श्रीराम मंदिर असून ते धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक श्रावण सोमवार, महाशिवरात्री, तसेच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांप्रसंगी येथे हजारो भाविक गर्दी करतात. या मंदिरासमवेतच जोतिबा मंदिरही आहे, जे देखील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिरांची डागडुजी व संरक्षक संरचना,बाग-बगीचा व सौंदर्यकरण व या परिसरात बोटिंग सुविधा तसेच भाविकांसाठी विश्रामगृह व सभागृह, घाट व पायऱ्या, स्वागत कक्ष व माहिती केंद्र स्वच्छतागृहे व किचन शेड आदी कामे करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली आहे. कंदर हे गाव टेंभुर्णी-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग वरील असल्याने येथे आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आदी दक्षिणेकडील राज्यांमधून शिर्डीकडे जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. यामुळे या ठिकाणी पर्यटन वाढीस मोठा वाव असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात.
त्यामुळे प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी व भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत आवश्यक निधी मंजूर करावा अशी मागणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे केली आहे. नाईक यांनी संबंधित अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश दिले आहेत.