करमाळा: पुढारी वृत्तसेवा अहिल्यानगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर करमाळा तालुक्यातील मांगी टोलनाक्या जवळील वळणावर अपघात झाला असून यामध्ये एक महिला ठार झाली आहे. या भरधाव वेगाने येणाऱ्या माल ट्रक क्रमांक (एम एच १८- बी एच/९५०७) ने पुढे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
रतन मगन नलवडे (वय ५९) रा. कामोने तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे अपघातात जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव असून मगन रामकृष्ण नरोडे (वय ६७) असे गंभीर जखमी झालेल्या चे नाव आहे. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
याबाबतची हकीगत अशी की या अपघातातील दांपत्य हे कामोणे येथील रहिवासी असून त्यांचे गावांमध्ये किराणा दुकान आहे. ते करमाळा येथे बाजार करण्यासाठी मोटरसायकल वरून येत होते. यावेळी ते मांगी टोल नाक्याजवळील पुलाजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये महिलेला मोटार सायकल सह चक्क २०० फूट दूर फरफटत नेले . त्यामुळे या महिलेचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे. यावेळी जखमी झालेल्या मगन नलवडे यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर पुन्हा खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेण्यात आले.
अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पळून गेला. दरम्यान करमाळा पोलिसांनी ट्रक सह एकावर कारवाई करत ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत रतन नलवडे यांच्या पश्चात पती व दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या किसान सेलचे अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या रतन नलवडे या चुलती होत.