पंढरपूर : अधिक मासातील कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाली असून, दर्शन रांग गोपाळपूर रोडवर दाखल झाली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या पददर्शनासाठी आठ तासांचा कालावधी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकादशीनिमित्त पंढरपुरात सुमारे 6 लाखांहून अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश मंदिर समितीला देण्यात आले होते. दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आहेत.
भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांग लावली आहे. यामुळे पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या सहा दर्शन मंडपापर्यंत गेली असल्याचे दिसून येत आहे. हरी नामाच्या गजराने पंढरीनगरी दुमदुमून गेली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग तसेच स्टेशन रोड भाविकांनी फुलला आहे.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दर्शन रांगेत पाहणी केली. भाविकांशी संवाद साधला. मंदिर समितीकडून देण्यात येत असलेल्या अत्यावश्यक सेवासुविधांबाबत माहिती जाणून घेतली.