रमेश दास
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. तालुक्यातील यावली गावचे सुपुत्र, दिग्दर्शक शशी चंद्रकांत खंदारे यांच्या 'जिप्सी' या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचा झेंडा रोवला आहे.
या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी बालकलाकार कबीर खंदारे याला '७१ वा सर्वोत्कृष्ट बालकलाकार' हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे, तर दुसरीकडे 'जिप्सी' चित्रपटाला गोव्यात होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत नामांकन मिळाले आहे. या दुहेरी यशाने खंदारे पिता-पुत्रांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित 'इफ्फी' हा आशियातील एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. या महोत्सवाच्या ५५ व्या पर्वात, पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी जगभरातील सात चित्रपटांची निवड झाली असून, त्यात 'जिप्सी' हा एकमेव मराठी चित्रपट आहे. या पुरस्काराच्या विजेत्याला मानाचा 'रौप्य मयूर' (Silver Peacock), १० लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
'जिप्सी' ही आयुष्यभर पोटासाठी भटकंती करणाऱ्या एका भटक्या जमातीतील कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा आहे. 'ज्योत्या' नावाच्या एका लहान मुलाला रोज मिळणारे शिळे अन्न खाण्याचा कंटाळा आला आहे. ताज्या आणि गरम जेवणाची त्याची आस चित्रपटाच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहे. 'बोलपट निर्मिती' संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून, यापूर्वी महाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी पाठवलेल्या तीन मराठी चित्रपटांमध्ये 'जिप्सी'चा समावेश होता. या यशामागे दिग्दर्शक शशी खंदारे यांची मेहनत आणि बालकलाकार कबीरचा सहजसुंदर अभिनय यांची मोठी भूमिका आहे.
'इफ्फी'मधील पदार्पणीय दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करण्यासाठी एक उच्चस्तरीय परीक्षक मंडळ नेमण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर असून, त्यांच्यासोबत अँथनी चेन (सिंगापूरचे दिग्दर्शक), एलिझाबेथ कार्लसन (अमेरिकन-ब्रिटीश चित्रपट निर्मात्या), फ्रान बोर्गिया (स्पॅनिश निर्माते) आणि जिल बिलकॉक (ऑस्ट्रेलियाचे संकलक) असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मान्यवर आहेत. एका लहानशा गावातील कलाकाराने राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे, तर त्यांच्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी सिनेमाची पताका उंचावली आहे. मोहोळ तालुक्याच्या शिरपेचात रोवलेला हा मानाचा तुरा निश्चितच अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल.