सोलापूर : सोलापूरच्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे. मोदीखाना येथील झोपडपट्टी ते देशाचे सर्वोच्च सभागृह असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. इतकेच नाही तर पत्रकारिता ते संसद हा त्यांच्या करिअरचा ग्राफ ही थक्क करणारा आहे.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ज्योतीने स्वकर्तृत्वाने राज्यसभेत जाण्याचा मान मिळवला आहे. घरात अठरा विश्व दारिद्य्र असताना गरिबीवर मात करीत सोलापूरच्या लेकीने हा नवा राजकीय इतिहास घडवला आहे. घरात मराठी भाषेचा आणि शिक्षणाचाही गंध नाही. अत्यंत जिद्दीने तिने शिक्षण घेतले. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा अस्खलित बोलणाऱ्या ज्योती यांनी विविध स्पर्धांमध्ये अव्वल स्थान कायम पटकाविले. इतकेच नाही तर बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात त्या अव्वल होत्या.
दलित चळवळीचा वारसा जपत एम ए (इंग्रजी), पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सोलापुरातील नामंवत महाविद्यालयात प्राध्यपक म्हणून सेवा करत असताना त्यांची काँग्रेसपक्षाच्या महिला आघडीच्या शहराध्यक्षपदी निवड झाली. शहराध्यक्षपदावर असताना आपल्या वक्तृत्वशैलीमुळे स्वतःची राजकीय ओळख निर्माण केली. मात्र काही काळात त्यांनी काँग्रेस सोडली आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदे सेनेच्या स्टार प्रचारक म्हणून निवड झाली. डॉ. ज्योती वाघमारे हिने सोलापूरसह राज्यातील अनेक राजकीय मैदाने आपल्या भाषणाने गाजवली.
रोख ठोक बाणा, करारी आवाज, हजर जबाबी या गुणांवर सतत सामाजिक क्षेत्रात त्या अग्रेसर राहिल्या. एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी आणि विरोधकावर तुटून पडण्याच्या वक्तृत्व शैलीने शिवसेनेत स्वतःचे अढळ असे स्थान तिने निर्माण केले. सोलापूरची लेक आता संसद गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदीखाना ते देशाचे सर्वोच्च सभागृह असा थक्क करणारा ज्योती यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी राहिला आहे.
राज्यातील तमाम बहिणीचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली आहे. माझी उमेदवारी राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहणींची उमेदवारी आहे. लाडक्या भावाने दिलेली ओवाळणी आहे. खरच विश्वास बसत नाही. सोलापूरच्या गल्लीतील सर्वसामान्य परिवारातील जन्माला आलेली मुलगी, गरिबीचे चटके खाल्ले. सत्ता काय असते, राजकारण काय असते यांचा स्पर्श नव्हता. तरी देखील सोलापूरच्या दलित बेटीला उमेदवारी दिली. सोलापूरच्या गल्लीमध्ये अनवाणी पायाने फिरलेली मुलगी दिल्लीच्या सभागृहात जात आहे. खरं वाटत नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे शक्य झाले.- ज्योती वाघमारे , उमेदवार शिवसेना