joint action by Revenue and Police Departments: Swift Action Against Sand Mafia in the Bhima River Basin
देवडे : पुढारी वृत्तसेवा
पंढरपूर तालुक्यातील देवडे गाव परिसरातील भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. स्थानिक स्तरावरून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
माहितीनुसार, भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच पंढरपूर पोलीस ठाण्याचे PSI सुरज हेंबाडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करण्यात आले. महसूल विभागानेही यामध्ये सक्रिय भूमिका घेत आवश्यक समन्वय साधत कारवाईची रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर संयुक्त पथकाने घटनास्थळी अचानक धाड टाकली. अशोक लेलँड वाहनाच्या सहाय्याने नदी पात्रात थेट प्रवेश करून कारवाई करण्यात आल्याने उत्खनन करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
कारवाईदरम्यान घटनास्थळी सुरू असलेले उत्खनन तात्काळ थांबविण्यात आले. तपासणीअंती दोन ट्रॅक्टर व एक दुचाकी जप्त करण्यात आली. या वाहनांचा वापर अवैध वाळू वाहतुकीसाठी होत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त वाहनांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या मोहिमेत पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल विभागाने प्रभावी सहभाग नोंदवला. पंढरपूर पोलीस ठाण्याकडून PSI सुरज हेंबाडे, शिवानंद हुलजंती, राहुल लोंढे यांनी कारवाईत सहभाग घेतला, तर करकंब पोलीस ठाण्याकडून संदेश शिकतोडे, नाना कांबळे यांनी सहकार्य केले.
महसूल विभागाकडून मंडळ अधिकारी शामबाला कुंभार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचे मार्गदर्शन केले. तसेच ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा इंगोले मॅडम यांनी आवश्यक नोंदी, पंचनामा प्रक्रिया व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक पोलीस पाटील यांचाही या कारवाईत सक्रिय सहभाग होता.
अवैध वाळू उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे अशा प्रकारच्या कारवायांना अधिक गती देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काळातही अशाच धडक मोहिमा राबवून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.