सोलापूर : प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसची आसन रचना ही उभ्या पध्दतीची असून ती अयोग्य असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा अबाल वृध्द व गरोदर महिलांना होतो. प्रवाशांसाठी आसनांची मांडणी योग्य नाही. यात मध्यभागी पाय ठेवण्यासाठीही योग्य जागा उपलब्ध नाही. सोयी कमी आणि गैरसोयीच अधिक जाणवत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी पुढे येत आहेत.
विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात आसनांची रचना आणि प्रवाशांना मिळणारी जागा महत्त्वाची ठरते. सलग काही तास प्रवास करताना पुरेशी लेगरूम व योग्य आसनकोन नसल्याने थकवा जाणवतो. या बसची रचना प्रवाशांच्या शारीरिक सोयीच्या दृष्टीने योग्य नाही. ही बैठक व्यवस्था तज्ज्ञांकडून तपासण्याची गरज आहे. या बसमधून प्रवास केलेल्या प्रवाशांचे अनुभव वेगळेच आहेत. चुकीच्या पद्धतीची बसमधील आसन व्यवस्था आहे, अशी भावना अनेकांची आहे.
जिजाऊ ही बस लांब पल्ल्यासाठी धावणारी बस नाही. स्थानिक मार्गावरून धावणारी आहे. यातील आसन रचनेची प्रवाशांची तक्रार असेल तर याविषयी वरिष्ठ कार्यालयाला कळवले जाईल.- शीतल बिराजदार, मुख्य अभियंता, मध्यवर्ती कार्यशाळा, सोलापूर.
राजमाता जिजाऊ बसची आसन रचना प्रवाशांसाठी त्रासदायक अशीच आहे. सीट उभ्या पध्दतीच्या आहेत. वयस्करांना त्रासदायक ठरते.- बसवराज घोडके, प्रवाशी भंडारकवठे
राजमाता जिजाऊ या बसमधील सीटची रचना उभी आहे. यामुळे या बसमध्ये अधिक वेळ बसून प्रवास केल्यास त्रास जाणवतो. सीटची व्यवस्था आरामदायी अशी नाही.- लक्ष्मी ननवरे, महिला प्रवासी, गुड्डापूर, ता. जत