सोलापूर : शरद पवार हे प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. मुख्यमंत्री पदावर असूनही त्यावेळी शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तेव्हा जर शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिले असते तर आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी पवारांवर टीकास्र सोडले.
पालकमंत्री गोरे रविवारी दुपारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजनेच्या कार्यशाळेस उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. आता शरद पवार यांना जे सुचतेय, ते आधी का नाही सुचलं. जो सत्तेत असतो, त्यांना सर्वांना सोबत घेऊन जावे लागते. सरकार सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहे. कुणाच्या ताटातील काढून कुणाच्या ताटात वाढायची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांना आवडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना सर्वश्रेष्ठ आहे, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
58 लाख कुणबी नोंदी शोधून दिल्या
मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. आत्तापर्यंत राज्यात सर्वाधिक 58 लाख कुणबी नोंदी शोधून काढण्यात आले. आरक्षणाच्या प्रश्नांबाबत मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोणावर अन्याय करून न्याय देता येणार नाही, असे मतही यावेळी पालकमंत्री गोरे यांनी यावेळी व्यक्त केले.