सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पावरून खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
एखादा प्रकल्प देशाच्या हिताचा असताना त्याला अशा प्रकारे विरोध करणे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली. पालकमंत्री गोरे शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मोहिते-पाटील यांची कंपनीने आमच्यासोबत बसावे, अशी मागणी आहे. मात्र, त्यामागील कारण सर्वांना माहिती आहे. उद्या हाच डेटा सेंटर प्रकल्प गुजरातमध्ये गेला, तर हेच लोक महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला घेऊन गेले, अशी टीका करतील. त्यामुळे प्रकल्पाबाबत वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
डेटा सेंटर प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांशी प्रशासनाची चर्चा सुरू असून, त्यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली जात आहे. या प्रकल्पासाठी केवळ अर्धा टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. दुसरीकडे, सौरऊर्जा प्रकल्पामुळे धरणातील सुमारे दीड टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन वाचण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पातून तीन हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार, तर ३० ते ३५ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पातून वीजनिर्मिती होणार असल्याने शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होण्यासही मदत होईल. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा असून, त्याबाबत गैरसमज पसरवण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांना केवळ राजकीय भूमिकेतून विरोध करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
खा. प्रणिती शिंदे यांनी वडिलांकडून शिकावे
खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून राजकारणाचे धडे घ्यावेत, असा टोला पालकमंत्री गोरे यांनी लगावला. सुशीलकुमार शिंदे हे सुसंस्कृत नेते असून, त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका कधी घेतली नाही. सध्या चर्चेत असलेल्या मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) प्रक्रियेबाबत त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, असे गोरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासह ज्या राजकीय पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला, त्यांचे स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकला पाणी देण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्याची तहान भागवू
कर्नाटकातील इंडी येथील आमदार यशवंतराव पाटील यांनी उजनी धरणातून भीमा नदीमार्गे कर्नाटकच्या हद्दीत दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. यावर बोलताना गोरे म्हणाले, उजनी धरणातील पाण्याचे यापूर्वीच वाटप झाले आहे. त्यामुळे सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्याची पाण्याची गरज भागवली जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत कर्नाटकला पाणी सोडणे शक्य नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.