सोलापूर

Jaykumar Gore : गोकुळ पॅटर्न’च्या स्वप्नांवर पाणी; काहींनी तर देव पाण्यात ठेवले होते

पालकमंत्री जयकुमार गोरेंचा हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणीत पॅनलने विजय मिळवल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ‘गोकुळ पॅटर्न’च्या माध्यमातून जिल्हा बँकेवर आपली सत्ता येईल, या आशेने काहींनी देव पाण्यात ठेवले होते; मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरले, अशा शब्दांत त्यांनी विरोधक मोहिते पाटील यांना नाव न घेता टोला लगावला.

या निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनलने बाजी मारल्याने विरोधकांच्या राजकीय रणनीतीला धक्का बसल्याचे चित्र आहे. गोकुळ पॅटर्नचा दाखला देत जिल्हा बँकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मतदारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, असे सूचक वक्तव्य गोरे यांनी केले.

मनीष देशमुख यांच्या विजयाबाबत बोलताना गोरे म्हणाले की, त्यांची निवडणूक अजिबात सोपी नव्हती. विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे समोर आली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेतून आम्हीही बोध घेतला आहे. आगामी काळात सहकार क्षेत्रातील निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच पुढील दिशा ठरवली जाईल. बँकेच्या चेअरमनपदी कोण विराजमान होणार, याबाबत आमचे ज्येष्ठ नेते आणि सहकारी एकत्रितपणे निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खा. प्रणिती शिंदे यांच्यावरही नाव न घेता गोरे यांनी निशाणा साधला. देशपातळीवरील राजकीय प्रश्नांवर भाष्य करण्यापेक्षा आधी आपल्या घराजवळ आणि सोलापूरमध्ये काय सुरू आहे, याकडे लक्ष द्यावे. स्थानिक राजकारणातील परिस्थिती समजून घेतल्यानंतरच देशपातळीवरील प्रश्नांवर बोलावे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. या पत्रकार परिषदेत माजी आ. राजन पाटील, दिलीप माने, दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक, नूतन संचालक आ.बाबासाहेब देशमुख, आ.देवेंद्र कोठे, राम सातपुते, नूतन संचालक मनीष देशमुख, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT