सोलापूर

Jaykumar Gore : दोन्ही उमेदवार शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध

पालकमंत्री जयकुमार गोरे; महायुतीच्या उमेदवारांसाठी करमाळ्यात सभा

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, भाजपने दोन्ही मतदारसंघांत उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार दिले आहेत. उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक वारसा असून शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. दोन्ही उमेदवार हे शिक्षक व शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध असून ते मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदार संघातील कौस्तुभ मुरलीधर गावडे या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करमाळा यातील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार जयवंतराव जगताप, विद्या विकास मंडळाचे सचिव व बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, युवा नेते दिग्विजय बागल, युवा नेते शंभूराजे जगताप, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील, नागरिक संघटनेचे नेते कन्हैय्यालाल देवी, पं.स.सदस्य भरत अवताडे, उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी देशभक्त कै.नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.राजेंद्र राऊत, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भाषणे झाली. प्रास्ताविक किशोर जाधवर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन नवले व दत्तात्रेय भागडे यांनी केले. युसूफ शेख यांनी आभार मानले.

आ. पाटील, माजी आ. शिंदे सोबतच

आमदार नारायण पाटील व माजी आमदार संजयमामा शिंदे हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठका घेत आहेत. आमदार नारायण पाटील हे आदल्या दिवशी दिवसभर सोबत असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

यापुढेही दुष्काळी मदत मिळणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली आहे. ही अंतिम मदत नसून पुढेही दुष्काळी मदत मिळणार आहे. पदवीधर व शिक्षकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी, अनुदानित शिक्षण संस्थांसह सेल्फ फायनान्स संस्थांनाही भौतिक सुविधांसाठी शासकीय निधी उपलब्ध करून देऊ. तसेच त्या अडचणी सोडवू, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT