सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द करण्याचा विभागीय जात पडताळणी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) रद्द केला. पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. खा. डॉ. महास्वामी यांनी निवडणुकीसाठी बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती.जातीच्या दाखल्याची चौकशी करणार्या समितीने महास्वामी यांना पुरेसा वेळ दिला नाही. पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याची पुरेशी संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. यासंदर्भात पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी खा. महास्वामी यांनी केली होती. ही मागणी मान्य करुन पुन्हा पडताळणीचे आदेश दिले आहेत. अक्कलकोटच्या तहसीलदारांनी या प्रकरणात महास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही या आदेशात म्हटले होते. या निर्णयाविरुद्ध जयसिद्धेश्वर यांनी अॅड. अनुप पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर बुधवारी न्या. सुनील शुकरे आणि न्या. राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी विभागीय समितीचा दाखला रद्दचा निर्णय रद्द ठरविला. विभागीय समितीने या प्रकरणात पुन्हा चौकशी करावी. सहा महिन्यांच्या आत यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे आदेश दिल्याचे अॅड. स्वामी यांनी सांगितले.