अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील पाच सैनिक परिवारातील किंवा निवृत्त सैनिकांना पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयु) च्या ‘जय जवान प्लस शिष्यवृत्ती’ अंतर्गत ऑनलाईन डिग्री कार्यक्रमांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.
या शिष्यवृत्ती योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे. याची प्रवेशाची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. या शिष्यवृत्तीसाठी सैन्य दलातील सुरक्षादल (आर्मी), नौदल (नेव्ही), हवाईदल (एअरफोर्स) या सेवेत असलेल्या तसेच निवृत्त सैनिक आणि त्यांच्या पत्नी, पती, मुलगा, मुलगी हे पात्र ठरतील.
सदरच्या योजनेतील उपलब्ध अभ्यासक्रम- पदव्युत्तर अभ्यासक्रम-(पीजी) : एमबीए, एमसीए, एमए (इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र), एम.एस्सी. (अर्थशास्त्र, गणित), एम.कॉम., पदवी अभ्यासक्रम (युजी) बीए, बीसीए, बीबीए. डिप्लोमा अभ्यासक्रम- डीबीए, डीसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नामनिर्देशन पत्र, निवृत्त सैनिक किंवा सेवेत असलेल्या सैनिकांचे ओळखपत्र आणि नाते दाखवणारा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे (10 वी, 12 वी आणि पदवी, पदव्युत्तर) अशी कागदपत्रे लागणार आहेत. प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह 30 सप्टेंबरपर्यंत लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून फॉर्म भरता येईल किंवा खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.