सोलापूर : सध्या शहर-जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने तीळ वड्या, लाडू, चिक्की यासारख्या पारंपरिक पदार्थांना मोठी मागणी होत आहे. त्यामुळे गुळाची मागणी वाढली असून, दरातही वाढ झाली आहे.
सध्या थंडी वाढल्याने बाजारात तीळ वड्या, चक्कीच्या खरेदीत लक्षणीय वाढ दिसून येत असून, याचा थेट परिणाम गुळाच्या दरांवर झाला आहे. साखरेऐवजी आरोग्यदृष्ट्या फायदेशीर मानल्या जाणाऱ्या गुळाचा वापर तीळ वड्या, चक्कीमध्ये वाढल्याने व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गूळ खरेदी करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुळाला चांगला भाव मिळत असून, गेल्या काही दिवसांत गुळाच्या दरात प्रति क्विंटल लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाच्यावर्षी ऊस गाळप हंगाम सुरू असला तरी काही भागात उत्पादन मर्यादित असल्याने गुळाची आवक अपेक्षेइतकी नाही. त्यातच थंडीमुळे गुळापासून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढल्याने बाजारात गुळाला चांगला दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.