बार्शी : गत काही महिन्यांपासून बार्शी शहर व तालुक्यासह लगतच्या काही जिल्ह्यात सुरू असलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या प्रकरणाला दै. ‘पुढारी’ने वाचा फोडल्याने गुंतवणूकदारांमधून खळबळ उडाली आहे. न्याय मिळण्यासाठी गुंतवणूकदारांतून जागृती निर्माण झाली आहे. मुख्य सूत्रधार कधी पुढे येणार, याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
दैनिक ‘पुढारी’ने गुरुवारच्या अंकात जादा आमिषाला बळी पडून शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या मनातील तगमग बाहेर काढून त्याला वाचा फोडली. हे वृत्त प्रसिद्ध होताच शहरांमध्ये व राज्यात त्या गुंतवणूकदारांचे फोन एकमेकांकडे खणखणताना दिसून येत होते. ‘पुढारी’ने मांडलेले वास्तव आपण स्वीकारून या बाबीसाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्या गुंतवणूकदारांमधून बोलले जात होते. लवकरच या संदर्भात बैठक घेऊन गुन्हा दाखल करणे यासह इतर बाबींवर निर्णय घेतला जाईल, यादृष्टीने पावले उचलली जात होती. पुणेस्थित त्या शेअर बाजारात काम करणार्या व अनेकांना गंडा घातलेल्या कंपनीने अनेकांना रस्त्यावर आणले असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत.
गुंतवणूकदारांमधून एकत्रिकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसून येत असून, यासाठी नक्कीच कोणीतरी पुढाकार घेऊन संबंधित दोषी कंपनीवर गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.