Dr. Sharankumar Limbale 
सोलापूर

Dr. Sharankumar Limbale : गाव, माती, माणसं माझ्या लेखनातून सुटली नाहीत

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीनंतर डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्याशी दैनिक ‘पुढारी’चा विशेष संवाद

पुढारी वृत्तसेवा

गौसपाक पटेल

सोलापूर : लेखक ज्या प्रदेशात वाढतो, तिथला भाग, भाषा, संस्कृती आणि तेथील लोकजीवन त्याच्या लेखनातून नैसर्गिकरीत्या साहित्यात उतरत असते. मी सोलापूरच्या भूमीत लहानाचा मोठा झालो, तो संपूर्ण परिसर माझ्या साहित्यातून वेळोवेळी स्पष्टपणे व्यक्त झाला. गाव, माती, माणसं माझ्या लेखनातून कधीच सुटली नाहीत, अशी भावना शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना व्यक्त केली.

संमेलनाध्यक्ष निवडीनंतर प्रस्तुत प्रतिनिधीने डॉ. लिंबाळे यांचे दैनिक ‘पुढारी’च्या वतीने अभिनंदन करत त्यांच्याशी संवाद साधला. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर हे डॉ. लिंबाळे यांचे जन्मगाव असून, चपळगावातील ग्रामीण विद्याविकास विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांच्या रूपाने अ. भा. साहित्य संमेलनाध्यक्षाचा मान तिसऱ्यांदा सोलापूरला मिळाला आहे. या निमित्ताने डॉ. लिंबाळे यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात असा...

प्रश्न : संमेलनाध्यक्ष निवडीच्या ऐतिहासिक क्षणी तुमची प्रतिक्रिया काय आहे?

उत्तर : मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाच्या आयोजक संस्थेने अतिशय विधायक आणि पुरोगामी निर्णय घेतला आहे. १०० व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी दलित माणसाला संधी दिली. साहित्य महामंडळाने घेतलेल्या या ऐतिहासिक भूमिकेमुळे मला मनस्वी आनंद होत असून, मी महामंडळाचा सदैव ऋणी आहे.

प्रश्न : महामंडळाच्या या निर्णयामागे कोणता मुख्य वैचारिक दृष्टिकोन आहे असे वाटते?

उत्तर : सामाजिक न्यायाचा विचार लोकांपुढे गेला पाहिजे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, हाच मुख्य दृष्टिकोन महामंडळाने ही निवड करताना ठेवला आहे, असे मला वाटते.

प्रश्न : महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडीचे काय महत्त्व आहे?

उत्तर : सध्या महात्मा फुले यांची द्विशताब्दी साजरी होत आहे. अशा या महत्त्वपूर्ण काळात मी संमेलनाध्यक्ष झालो आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आज जर महात्मा फुले हयात असते, तर दलितांमधील माणूस साहित्य विश्वाच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्याचे पाहून त्यांना खूप आनंद झाला असता.

प्रश्न : महामंडळाच्या या भूमिकेकडे तुम्ही व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून कसे पाहता?

उत्तर : दलितांमधील एका माणसाला अशी संधी देणे ही मराठी साहित्य महामंडळाने घेतलेली अत्यंत सकारात्मक आणि विधायक भूमिका आहे. या पुरोगामी निर्णयाचा मला अभिमान वाटतो.

प्रश्न : लेखकाच्या साहित्यावर आणि जीवनदृष्टीवर त्याच्या मूळ प्रदेशाचा कसा प्रभाव पडतो?

उत्तर : आपण ज्या भागात जन्मलो त्या मूळ भागाचे आणि मातीचे संस्कार कधीही विसरता येत नाहीत. मला माझ्या सोलापूर जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावात जे काही जगायला मिळाले व प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले, तेच मी माझ्या साहित्यामध्ये प्रामाणिकपणे मांडलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT