Solapur Municipal Elections Pudhari Photo
सोलापूर

Solapur Mayor: सोलापुरात महापौर पदासाठी भाजपमध्ये जोरदार लॉबिंग

दोन्ही आमदार गट आमने-सामने; वेगवेगळ्या बैठका

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूरचा महापौर निवडीवरून भाजपमधील दोन आमदार गटांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. शनिवार, 24 जानेवारी रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नगरसेवकांना स्पष्ट मार्गदर्शन करत 28 जानेवारी रोजी विभागीय कार्यालयात आयुक्तांकडे गॅझेट संदर्भातील सह्या करण्यासाठी जाण्याच्या सूचना दिल्या. सर्वांनी दोन लक्झरी बसमधून जाण्याची तयारी ठेवावी, आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत असावीत तसेच प्रसारमाध्यमांसमोर कोणीही कोणतेही वक्तव्य करू नये, असे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले.

दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह एका नगरसेविकेच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शन केले. या बैठकीत आमदार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या महापौरपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या किरण देशमुख यांची महापौरपदासाठी एकमुखाने शिफारस करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

तर यापूर्वीच आमदार देवेंद्र कोठे गटाकडून त्यांचे भाऊजी विनायक कोड्याल यांच्यासाठी जोरदार आग्रही भूमिका घेतली जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही विनायक कोड्याल यांना ‌‘ग्रीन सिग्नल‌’ दिल्याची चर्चा असून, त्यांचे नाव प्रदेश पातळीपर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

एमआयएम पक्ष न्यायालयीन दरवाजे ठोठावणार

महापालिका निवडणुकीत मतदारांनी एमआयएम पक्षाला आठ नगरसेवक निवडून दिले आहेत. विरोधी बाकावरचा हा सर्वात मोठा पक्ष आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळाले पाहिजे. कारण दहा टक्केचा नियम इथे लागू होत नाही, असे कायद्याच्या अभ्यासकांचे मत आहे. सभागृहात महापौरांनी जर मान्यता दिली नाही तर न्यायालयात जाण्याची भुमिका पक्षाने घेतली आहे.

बैठकीत सभागृह नेता निवडीवर चर्चाच नाही

बैठकीत सभागृह नेता निवडला जाईल असे अपेक्षा होती मात्र यावर कोणतीही चर्चा झाली नाही. 28 जानेवारीला पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीत सभागृह निवडीचा मुहूर्त काढला असल्याचे बोलले जाते.

सभागृह नेत्याचे नाव प्रदेश बैठकीत ठरणार

28 जानेवारी रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत सभागृह नेत्याचा निर्णय अंतिम केला जाईल. यासंदर्भातले नाव प्रदेश पातळीवरून बैठकीच्या वेळी येणार असल्याचे सांगण्यात आले.भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी पुण्यातील विभागीय कार्यालयात केली जाणार आहे.

मराठा समाजाचा महापौरासाठी दबाव गट सक्रिय

सोलापूर महानगरपालिकेत भगवानराव चव्हाण, मनोहर सपाटे हे दोनच मराठा समाजाचे महापौर झाले आहेत यंदा महापालिकेत 15 मराठा समाजाचे नगरसेवक आहेत. यातील बहुतांशी नगरसेवक हे भाजपाच्या सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे यंदा मराठा समाजाला महापौर देण्यासाठी समाज आग्रही झाला आहे. या संदर्भातला एक दबाव गट मुंबईमध्ये देखील रवाना झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भेटीसाठी चालू असल्याचे वृत्त आहे. अनंत जाधव यांचे नाव महापौर पदासाठी अग्रेसर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT