सोलापूर

Indurikar Maharaj: जि.प. शाळांसाठी इंदुरीकर महाराज मैदानात

शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार यांनी कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती देशमुख (इंदुरीकर महाराज) यांची भेट घेऊन विनंती केली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गोरगरीब व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेच्‍या शाळा बंद पडत आहेत. त्‍या शाळा टिकल्‍या पाहिजेत, यासाठी शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार यांनी कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती देशमुख (इंदुरीकर महाराज) यांची भेट घेऊन विनंती केली आहे. त्‍यामुळे इंदुरीकर महाराज झेडपी शाळा टिकविण्यासाठी जनजागृतीच्‍या माध्यमातून मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे.

बंद होत असलेल्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या शाळा, शिक्षकांवर वाढलेली अशैक्षणिक कामांची जबाबदारी, रिक्त पदांचा प्रश्न आणि टीईटीसारख्या विषयांवर समाजात योग्य जनजागृती होणे गरजेचे आहे. या विषयांवर कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही इंदुरीकर महाराज यांनी दिली आहे.

वाणीचिंचाळे (ता. सांगोला) येथील शिक्षक अशोक गंगाधरे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कीर्तनानंतर शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या अनौपचारिक संवादात ते बोलत होते. यावेळी शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष अमोघसिद्ध कोळी, प्रसाद कुलकर्णी, शांताराम गाजरे उपस्थित होते.

महाराजांनी व्‍यक्‍त केली नाराजी

इंदुरीकर महाराज यांनी शिक्षकांवर लादण्यात आलेल्या टीईटी परीक्षेबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षकांचे अध्यापन कौशल्य, अनुभव आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रत्यक्ष काम यांचा पुरेसा विचार या परीक्षेत होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT