सोलापूर ः विविध रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यास नवीन प्रणालीद्वारे तक्रार नोंदवत वैद्यकीय उपचारासाठीही मदत घेता येणार आहे. प्रवासात अनेकवेळा चोरी, कोचमधील अस्वच्छता शिवाय यात मिळणारे निकृष्ट जेवण आदी समस्यांचा प्रवाशांना सामना करावा लागतो. अशा समस्यांवर तातडीने व तत्काळ उपायासाठी रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी रेल मदत ही प्रणाली सुरू केली होती. त्यात बदल करत अद्ययावतपणा आणल्याने या ॲपमुळे रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धावत्या रेल्वेतही प्रवाशांना तक्रार करण्याची सुविधा यात असून अशी तक्रार करताच फक्त काही मिनिटांत प्रशासनाकडून प्रतिसाद मिळणार आहे. यामुळे, रेल्वेच्या प्रवाशांमधून नव्या प्रणालीचे कौतुक केले जात आहे.
प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करताना अचानकपणे प्रकृतीत बिघाड झाली आणि तत्काळ वैद्यकीय मदतीची गरजच असेल, तर ती मदत यामुळे विनाविलंब संबंधिताला मिळणार आहे. तसेच, चोरीची घटना घडणे, कोचमधील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांकडून मिळणारी चुकीची वर्तणूक, कोचमधील निकृष्ठ जेवण आदी विषयांवर या रेल मदत ॲपवर तक्रार करत त्या तक्रारीच्या माध्यमातून मदत घेता येईल. तक्रारीनंतर नियंत्रण कक्षातील यंत्रणेकडून प्रवाशाला तत्काळ फोनवरून तक्रारीची दखल घेतली जाते. तक्रारीच्या निराकरणासाठी संबंधित विभागाकडे विषय वर्ग केले जाते. मोबाईल ॲप ही यंत्रणा तर आहेच. तसेच 139 या हेल्पलाइन वरूनसुद्धा ही सेवा उपलब्ध असून स्मार्टफोन नसलेल्या प्रवाशांनाही मदत मिळते. तक्रारींसाठी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात यापुढे प्रवाशांना रांगेत उभारण्याची गरज नाही. या प्रणालीवर तक्रार नोंदवताच ती रेल्वेच्या संबंधित विभागाकडे पाठवली जाते. या तक्रारीनंतर गतीने संबंधितावर कारवाई केली जाईल. यामुळे, कमी वेळेत अडचणींचे निराकरण होईल. ही प्रणाली सुरू झाल्यापासून सोलापूर विभागात मागील वर्षभरात दोन हजारांहून अधिक तक्रारींचे कॉल्स या नवीन प्रणालीद्वारे नोंदविण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी, वेगाने आणि प्रभावी निवारण करणारे रेल मदत ॲप हे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ त्याचे निराकरणही केले जाते. -योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक