सोलापूर : शहरातील दोन बडे सराफ व्यापारी, एक वकील तसेच एका बांधकाम व्यावसायिकावर बुधवारी (दि. 19) सकाळी केंद्रीय आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. सराफ दुकाने तसेच घरी एकाच वेळी झालेल्या या कारवाईमुळे सर्वजण हादरून गेले. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करीत होते. या तपासणीत आयकर विभागाच्या हाती काय लागले, याचा तपशील मिळू शकला नाही.
शहरातील सराफ बाजारातील सर्वात मोठ्या सराफ व्यावसायिकाच्या दोन्ही दुकानांवर तसेच टिळक चौक येथील घरावर आयकर विभागाने छापा मारला. तसेच मरिआई चौकातील त्याच फर्मच्या कन्स्ट्रक्शन साईडच्या कार्यालयातही आयकर विभागाचे अधिकारी धडकले आणि तपासणी सुरू केली.
सराफ बाजारातील सर्वात मोठा मनी लॅन्ड्रींगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाची सराफ कट्टयातील दोन दुकाने, जुने विठ्ठल मंदिर येथील दुकान, घर तसेच नवी पेठेतील घरावर आयकर विभागने छापा मारला.
तसेच शहरातील गांधी नगर परिसरातील नावाजलेल्या मंगल कार्यालयाचे मालक, बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर तसेच घरावर आयकर विभागाने छापा टाकला. संबंधिताने हॉटेल व्यावसायिक म्हणून फर्म दाखविली आहे. त्याचीही तपासणी आयकर विभागाच्या आधिकाऱ्यांनी छापा घालून सुरु केली. याशिवाय सोलापुरातील अनेक जागांच्या व्यवहारात, बांधकाम प्रकल्पात कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या नामवंत वकिलाच्या घरीही आयकर विभागाने छापा टाकला. या सर्वांची दुकाने, कार्यालये तसेच घरांची तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या धाडीत आयकर विभागाच्या हाती काय लागले याची माहिती मिळू शकली नाही.
बँकेशी संबंधितांवर छाप्याची चर्चा
सोलापुरातील हे दोन बडे सराफ व्यापारी, नामवंत वकील आणि बांधकाम व्यावसायिक यांचे एकमेकांशी कनेक्शन आहे का, याची चर्चा रंगू लागली आहे. गेल्या महिन्यात सोलापुरातील एका सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली. ज्या सराफ व्यावसायिकांवर छापे पडले ते या बँकेचे कर्जदार, फायनान्सर असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. ज्या वकिलाच्या घरावर छापा पडला ते याच बँकेचे कायदेशीर सल्लागार आहेत. त्यामुळे बँकेवरील कारवाईनंतर बँकेशी संबंधित व्यक्ती, फर्मवर आयकर विभागाचे छापे पडले. याचा एकमेकांशी काही संबंध आहे का, अशीही चर्चा दबक्या आवाजात होत आहे.