सोलापूर : आजपर्यंत आपण रेल्वेचे अनेक अपघात ऐकले आणि पाहिले असतील; मात्र शुक्रवारी (दि. 13) कुर्डूवाडी स्थानकावर पाहणी करून सोलापूरकडे निघताना स्पेशल गाडीचे इंजिन कुर्डूवाडी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकला घासल्याने प्लॅटफॉर्मचे नुकसान झाले. यात कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना हे सोलापूर विभागाच्या वार्षिक पाहणी दौर्यासाठी शुक्रवारी आले होते. कुर्डूवाडी रेल्वेस्थानकावर अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी तेथील पाहणी दौरा संपवून सोलापूरकडे येताना प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रूळ बदलताना इंजिनचा धक्का प्लॅटफॉर्मला लागल्याने प्लॅटफॉर्मचे नुकसान झाले. ही घटना लक्षात येताच गाडी थांबविण्यात आली. या घटनेमुळे जवळपास अर्धा ते एक तास महाव्यवस्थापक कुर्डूवाडी स्थानकावर थांबून राहिले. यामुळे पुढील दौर्याचे पूर्णपणे नियोजन कोलमडले. सोलापूर स्थानकावरील त्यांची येण्याची नियोजित वेळ चार वाजून 30 मिनिटांनी होती; मात्र ते रात्री सात वाजून पंधरा मिनिटांनी सोलापूर स्थानकावर दाखल झाले.
या घटनेमुळे कुर्डूवाडी स्थानकावर महाव्यवस्थापकांची स्पेशल रेल्वे एक तास थांबून राहिली. ही घटना कशी घडली, याची चौकशी रेल्वेचे वरिष्ठ अधिकार्यांनी केली; मात्र रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.