पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणार्या निर्माल्यापासून धुप व अगरबत्ती तयार करण्यात येणार आहे. ही धुप व अगरबत्ती भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यासाठी श्री ॠषिकेश भट्टड, प्रभव आरोमॅटिक्स पंढरपूर यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या निर्माल्यापासून धुप व अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भाविकांना आषाढी यात्रा 2025 पूर्वी धुप व अगरबत्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येणारे भाविक भक्तीभावाने श्रींस तुळशी, हार व फुले अर्पण करीत असतात. अर्पण केलेल्या हार-फुलांपासून धुप व अगरबत्ती तयार करण्यासाठी यापूर्वी थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज पुणे यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांचा प्रस्ताव रद्द करून श्री ॠषिकेश भट्टड, प्रभव आरोमॅटिक्स पंढरपूर यांना सदरचे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन ते चार प्रकारच्या अगरबत्त्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व श्री संत तुकाराम भवन येथे लवकरच स्टॉलद्वारे अल्प देणगी मूल्य आकारून भाविकांना धुप व अगरबत्ती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्याची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे.
मंदिरात येणार्या हार, फुले या निर्माल्यापासून धुप व अगरबत्ती उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. उत्पादन प्रत्यक्ष सुरुवात होऊन भाविकांना उपलब्ध होईपर्यंत श्रींच्या गाभार्यात जमा होणारी हार-फुले दर्शनरांगेतील भाविकांना देण्यात येत आहेत. भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही, याची दक्षता मंदिर समिती घेत आहे.-मनोज श्रोत्री व्यवस्थापक, मंदिर समिती