सोलापूर : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पॉवरलूम कामगार युनियन्स (सिटू) ने मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आणि किमान वेतन लागू करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यावेळी बोलताना कॉ. आडम मास्तर यांनी सांगितले की, 2015 च्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंत्रमाग कामगारांना 15,697 किमान वेतन मिळणे अपेक्षित आहे, पण त्यांना आजही त्यापेक्षा कमी वेतन मिळते. तसेच, केंद्रीय औद्योगिक न्यायालयाने 2019 मध्ये पी.एफ. लागू करण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तत्कालीन सरकारने यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती, परंतु सध्याच्या सरकारने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी कॉ. भरमा कांबळे, कॉ. दत्ता माने, गोपाल पोळा, विलास गायकवाड, मनोहर यरगट्टी, सुनील चव्हाण, मुमताज शेख, सूर्यभान यादव, प्रमोद यादव, भोलानाथ दिनकर, सुरेश सचान, मूलचंद यादव, सदानंद भारत उपस्थित होते.
जर आगामी अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी झाली नाही, तर भिवंडी ते मुंबई असा 50,000 कामगारांचा लाँग मार्च काढण्यात येईल आणि विधानसभेचे कामकाज थांबवले जाईल, असा इशारा कॉ. आडम मास्तर यांनी दिला आहे.- आडम मास्तर, माजी आमदार