मळोली : मळोली (ता. माळशिरस ) येथे गेली अनेक दिवसापासून अवैद्य दारू विक्री बंद करा. या मागणीसाठी मळोली ग्रामपंचायत व गावातील तरुण युवक पाठपुरावा करीत आहेत. मात्र दारू विक्री बंद न होता ती आणखी जोमात विकली जाऊ लागली असल्याचे चित्र सद्य स्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे अवैध दारु विक्री जोमात आणि पिणारे मात्र कोमात अशी परिस्थती निर्माण झाली आहे.
मळोली ग्रामपंचायत अंतर्गत अनेक वेळा ग्रामसभेत ठराव केलेले पत्र वेळापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. त्याबद्दल तात्पुरती कार्यवाही करून पुन्हा दारू विक्रेते यांना मोकाट सोडण्याचे प्रकार पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी दारू विक्री केली जात आहे. त्याच्या बाजूनी जिल्हा परिषद शाळा व नागरिकांची लोकवस्ती आहे. यातून अनेक वेळा वादाचे प्रसंग घडलेले आहेत. याच मार्गाने हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना पुढे शाळेसाठी जावे लागते. पोलीस व उत्पादन शुल्क विभाग यांनी सतत कार्यवाहीचा बडगा चालू केला, तर ही दारू विक्री कायमस्वरूपी बंद होऊ शकते.
चालू स्थितीत ऊस तोडणी कामगार व गावातील दारू पिणारे तळीराम यांच्या वाढत्या रहदारीमुळे दारू विक्रेते यांची चांगलीच दिवाळी चालू आहे. दिवसाकाठी 5 ते 10 हजार रुपयांची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. अनेक तरुण युवक कमी कष्ट व पैसा जास्त मिळत असल्याने या व्यवसायाकडे आकृष्ठ होऊ लागले आहेत.
संध्याकाळी पाच नंतर हा परिसर अगदी स्वछन्द पद्धतीने चालू असतो. यांना कोणाचेही भय राहिलेले दिसत नाही. अशा दारू विक्री व तळीराम यांच्या वागण्याने शालेय विद्यार्थ्यांना यांच्या त्रासास नाहक सामोरे जावे लागत आहे. जवळच असणारी देखणी जिल्हा परिषद शाळा व बाजूस असणारी दारू विक्रीची दुकाने ही युवा पिढीसाठी नाशाचे कारण ठरु पाहत आहेत.
मळोली गावची लोकसंख्या दहा हजाराच्या जवळपास आहे. गावात एक जिल्हा परिषद, दोन इंग्लिश स्कुल, एक हायस्कुल व एक कॉलेज अशी सुमारे बाराशे च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना हे दारू विक्री करणारे व दारू पिणारे रस्त्याने गोंधळ घालताना नेहमीच दिसून येतात. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. बस थांबा, रस्त्याच्या बाजूनी हे थांबून मद्यधुंद असतात. यातच भर म्हणून आणखी ऊस तोडीतील कामगार सहभागी झालेले दिसून येतात. या प्रकारास पोलीस ठाण्याच्या मार्फत अटकाव नाही घातला तर एक दिवस गावातील युवक दारूविक्रेते व दारू पिणारे यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.