वाशिंबे : कंदर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कंदर येथील अण्णासाहेब कदम या शेतकऱ्याची सात एकर केळी या वादळी वाऱ्यामध्ये भुईसपाट झाली. 45 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी चांगलाच बसला असून केम, कंदर,वडशिवणे ,सातोली भागातील अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या पिकाचे नुकसान झाले आहे.आखाती युद्धामुळे दर पडल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
माझ्या सात एकर शेतामध्ये ऑगस्ट महिन्यात साडेआठ हजार केळीची रोपे लागवड केली होती. सध्या केळीची विन पूर्ण होऊन एक ते दीड महिन्यात केळी काढणीला येणार होती, अशा परिस्थितीमध्ये वादळी वाऱ्याने संपूर्ण केळीचे पीक भुईसपाट झाले असून फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने मदत द्यवी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी अण्णासाहेब कदम यांनी केली आहे.