टेंभुर्णी : सर्वत्र गॅसची मोठी टंचाई भासत असताना टेंभुर्णी शहरात अवैधपणे घरगुती गॅस ट्रान्सफर करून गॅस सिलेंडरची विक्री करताना पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत एक तरुण रंगेहात मिळून आला आहे.
रामहरी यशवंत गलांडे (वय 31) रा.सुर्ली रोड,अकलूज चौक, टेंभुर्णी,असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या धाडीत गॅस ट्रान्सफर करण्याचे साहित्य, रिकामे 22 सिलेंडर व इतर वस्तूसह 49 हजार 899 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितम जालिंदर पवार (वय-33 वर्षे) पुरवठा निरीक्षण अधिकारी माढा तहसील कार्यालय माढा यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी शहरात गॅस टंचाईचा लाभ घेत एकजण गॅसची चोरी करून गॅस विक्री करीत असल्याची माहिती माढा तहसील कार्यालय येथील पुरवठा विभागास मिळाली होती.त्या अनुषंगाने माढा तहसीलदार कार्यालय येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रीतम पवार यांनी याबाबत माहिती घेवून अकलूज चौक येथील सुर्ली रोडवरील सिद्धी रिलायन्स एजन्सी (सिद्धी कॉम्प्लेक्स) येथे धाड टाकली असता तेथे राहणारा व या घटनेस जबाबदार असलेला आरोपी रामहरी यशवंत गलांडे हा आपल्या कब्जामध्ये सार्वजनिक ठिकाणी भर वस्तीमध्ये अवैध रित्या घरगुती गॅस सिलेंडर व घरगुती गॅस ट्रान्सफर करण्याच्या साहित्यासह मिळुन आला.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.या कारवाईने गॅस चा काळा बाजार चव्हाट्यावर आला असून याबाबत कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि गणेश चौधरी हे करीत आहेत