सोलापूर : अंत्रोळीकर नगरातील व्यापाराच्या घरी झालेली चोरी विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले 13 लाख 94 हजार रुपयांचे 22 तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
रवी प्रकाश दौलताबाद (रा. अंत्रोळीकर नगर भाग 3, होटगी रोड, सोलापूर) हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. तीन फेब्रुवारी रोजी सोलापुरात परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या गुन्ह्याचा कुशलतेने तपास करुन आठ दिवसात गुन्ह्याचा छडा लावला.
घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजचे पोलिस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे यांनी बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक माहितीच्या आधारे, आरोपी पारशी विहीर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला. अंकित ऊर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी (वय 34, रा. पुणे, सध्या रा. सोलापूर) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात आली. त्यांच्याकडून 63 ग्रॅमचा सोन्याचा हार, 50 ग्रॅमचा नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, विविध प्रकारच्या अंगठ्या (पोवळ्या, रुबी, लसुणी, ओम), कर्णफुले, टॉप्स आणि सोन्याची नाणी, 90 हजार रुपये किमतीचा सॅमसंग एस 23 अल्ट्रा मोबाईल असा एकूण 13 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप पवार, व.पो. निरीक्षक दादा गायकवाड, सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, अप्पा पवार, सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष माने, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगाव, स्वप्निल जाधव, अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.
मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा
विजापूर नाका पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शहरातील एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. या कामगिरीबद्दल पोलिस दलातून पथकाचे कौतुक होत आहे. या गुन्ह्यात अल्पवयीन बालक मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे. त्याच्या सोबतीला अंकुश वाल्मिकी होता. या आरोपींनी इतर मुद्देमाल कुठे लपवला आहे, तसेच आणखी गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.