दक्षिण सोलापूर : बाचाबाचीतून एकाला मारहाण झालेल्याला घरी आल्यावर अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात नेल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी वळसंग पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून तर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली. होटगी येथे ही घटना घडली.
हनिफ अब्दुलसत्तार नदाफ (वय 50, रा. होटगी) असे मृत झालेल्याचे नाव आहे. हनिफ नदाफ हे सोलापूर विमानतळ येथे भाड्याने वास्तव्यास आहेत. गुरुवारी बकरी ईद असल्याने ते बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान होटगी गावाकडे येत होते. सध्या होटगी रस्त्याचे काम चालू असून या ठिकाणी अज्ञात व्यक्तीबरोबर त्यांची बाचाबाची झाली. तेव्हा त्यांच्याकडून हनिफ यांना मारहाण झाली, तिथून ते घरी आले, मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
याबाबत वळसंग पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. मृताच्या कुटुंबीयांकडून जोपर्यंत अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला होता, मात्र अखेर पोलिसांनी कुटुंबीयांची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर होटगी येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले. नदाफ यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.