सोलापूर : होटगी विमानतळावर लाईट लँडिंग करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. ते काढणे खर्चिक आहे. त्यामुळे बोरामणी विमानतळ सुरू करण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्यासमवेत नुकतीच मुंबई येथे पंढरपूर कॉरिडॉर, विमानसेवा प्रश्नावर चर्चा केली. यावेळी बोरामणी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी सुविधा करण्याचा प्रस्ताव समोर आला. यासाठी प्रयत्नही सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, होटगी रोडवरून प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, अन्य शहरांसाठी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी या विमानतळावर नाईट लँडिंगसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा करण्याचा विचार असून, त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
होटगी रोडवरुन गोव्याची विमानसेवा सुरळीत सुरू आहे. 15 ऑगस्ट पर्यंत सोलापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, मात्र प्रवासी विमानसेवेत नाइट लँडिंगसाठी होटगी विमानतळ अडचणीचे ठरत आहे. होटगी रोड विमानतळावरील अतिक्रमण हटविणे, न्यायालयीन प्रकरणामुळे येथील सुविधा उभारणे खर्चीक व वेळखाऊ आहे. त्यामुळे बोरामणी विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
बोरामणी येथील आंतराष्ट्रीय विमानतळासाठी यापूर्वीच भूसंपादन पूर्ण केले आहे. याशिवाय अतिरिक्त जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. येथील सुमारे 32 हेक्टर क्षेत्र हे माळढोक अधिवास क्षेत्र आहे. त्यामुळे याबाबत केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार या ठिकाणी आवश्यक ती प्रक्रिया पुढे सुरू करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्याचा निर्णय लवकरच होणार आहे.
अरण येथील संत सावता माळी येथील स्मारकासाठी शासनाने 150 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. त्यासाठी आठ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्यास गती देण्यात येत आहे. पंढरपुरातील संत नामदेव महाराज स्मारकासाठी रेल्वेची 15 एकर जागा घेण्यात आली आहे. 65 एकर परिसरात या स्मारकाचे काम समन्वय समितीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्याकडून प्रस्ताव घेण्यात येत आहेत. यासाठी तीन उपजिल्हाधिकारी यांची समन्वयकांची नियुक्ती केली आहे. या समितीकडून कामही सुरू झाले आहे. ऑक्टोबरअखेर कॉरिडॉरबाबत अपेक्षित पल्ला गाठता येईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.