दक्षिण सोलापूर : होटगी -सोलापूर मुख्य रस्त्यावरील ज्वेलर्सचे शटर उचकटून लाखो रुपयांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
दुकानाचे मालक सिध्दाराम शिवानंद हुडे राहणार होटगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी सायंकाळी सिद्धाराम हुडे हेे दुकान बंद करून ते घरी गेले होते. गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन या वेळेमध्ये चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उचकटून आत प्रवेश केला, सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून पोबरा केला.
सोन्याचे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने चोरट्यांनी पहिल्यांदा येथील लाईटच्या वायरी कापल्या. सदर चोरटे हे दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. मात्र त्यांनी चेहरा मास्कने झाकला असल्यामुळे ओळखता आले नाही. घटनेची खबर कळताच अक्कलकोट परिक्षेत्रचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावार, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, डॉग स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक मस्के हे घटनास्थळी दाखल झाले. याचबरोबर श्वानपथक,स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट टीम घटनास्थळी येऊन त्यांनी दुकानातील हातांच्या ठशांचे नमुने संकलित केले. श्वानपथकातील डॉलीने दुकानापासून, मड्डी वस्तीतील मार्गाने भारत गारमेंट पर्यंत चोरट्यांचा माग काढला.
सदर चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून चोरांना कैद करण्यासाठी विविध पथके तैनात करून विविध दिशेला पाठविण्यात आली आहेत. लवकरच चोरट्यांना जेरबंद करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाईल.- अनिल सनगल्ले, सहा. पोलीस निरीक्षक