तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा
परंपरागत पद्धतीने तुळजाभवानी देवीच्या पुजारी, मंदिर संस्थांच्या अधिकारी आणि भाविक भक्त यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरा समोर होळी पूजन करण्यात आले.
गुरुवार दिनांक 13 मार्च, हुताशनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान येथे होलिकादहन पार पडले. श्री तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडासमोर मोठ्या उत्साहात होळीचे पूजन करून दहन करण्यात आले.
प्रथा परंपरेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिरातील होळी पूजनानंतरच तुळजापूर शहरातील घरोघरी होळीचे पूजन केले जाते. हुताशनी पौर्णिमेनिमित देवीचा छबिना काढण्याऐवजी होळी साजरी करण्यात येऊन जोगवा मागण्यात आला. होळी सणाच्या निमित्ताने आज सायंकाळच्या अभिषेक पूजेची घाट ६ वाजता झाली. रात्री ८.३० वाजता आरती, धुपारती करण्यात आली.
परंपरेनुसार मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे, पुजारी सुहास कदम, महंत हमरोजीबुवा, वाकोजीबुवा यांच्या हस्ते होलिकापूजन व दहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले, अमोल भोसले आणि अन्य मंदिर कर्मचारी व पुजारी उपस्थित होते.