सोलापूर : अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राने (आयसीटीसी) सात महिने गर्भवतीस एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा रिपोर्ट दिला. त्यामुळे पती व सासरकडील मंडळींनी चारित्र्यावर संशय घेत तिला नांदविण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, संबंधित पिडीतेने स्वतः अनेक स्वतंत्र केंद्रांमध्ये तपासणी केली असता सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले.
दरम्यान, याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. शासनाने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित महिलेने दिला. तसेच ती एचआयव्ही निगेटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी वर्तमान पत्रातून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी पीडितेने केली आहे.
याबाबत माहिती अशी, प्रसूतीपूर्व नियमित तपासणीसाठी पीडितेची अकलूज शासकीय रुग्णालयात आयसीटीसी किटद्वारे एचआयव्ही चाचणी केल्यावर अहवालात एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे नमूद केले. त्यावर आयसीटीसीचे डॉ. जे. एस. नेरे यांची स्वाक्षरी व शिक्का आहे. त्यानंतर पीडितेची पंढरपूरयेथे एचआयव्ही विषयी अनावश्यक तपासणी केली. मात्र, पीडितेने स्वतः पुढाकार घेऊन इंदापूर, पंढरपूर, बारामती अशा अनेक स्वतंत्र केंद्रांमध्ये तपासणी केली असता सर्वच ठिकाणचे रिपोर्ट एचआयव्ही निगेटिव्ह आले.
यावरून अकलूजच्या आयसीटीसीने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल हा वैद्यकीदृष्ट्या पूर्णतः चुकीचा, असल्याचे सिद्ध झाले. तसेच ‘कन्फर्मेटीव्ह टेस्ट’ बंधनकारक असताना आयसीटीसीने ती टेस्ट न करताच पीडितेला पॉझिटिव्ह घोषित केल्याचे पीडितेने सांगतिले.
या प्रकरणातील अकलूज येथील रक्त तपासणीच्या चुकीच्या अहवालाच्या चौकशीसाठी तिघांची चौकशी समिती नेमली आहे. समितीच्या अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल.- डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक