सोलापूर

Solapur News: मानेगावातील बारवेच्या पायरीवर आढळला ऐतिहासिक शिलालेख

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे एका चौकोनी आकाराच्या बारवेच्या तिसऱ्या पायरीवर कोरलेला शिलालेख आढळून आला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे एका चौकोनी आकाराच्या बारवेच्या तिसऱ्या पायरीवर कोरलेला शिलालेख आढळून आला. ऐतिहासिक सर्व्हेच्या निमित्ताने नितीन अणवेकर यांना तो शिलालेख आढळला. गावाच्या शेवटच्या भागात असलेली बारव खूप मोठी नसली तरी ती महत्त्वाचे आहे. या बारवाच्या आतमध्ये लहान मंदिर आहे.

सोलापूर जिल्ह्यात असे मंदिर असलेले बारव खूप कमी प्रमाणात आहेत. बारवाची थोडी पडझड झालेली असली तरी आजही बारवात मुबलक पाणी आहे. बारवात उतरण्यासाठी एक पायरीमार्ग आहे. बारवेच्या आत एक मोठे देवकोष्ठ असून त्यात महादेव मंदिर, शिवलिंग व नंदी आहे. याच पायरी मार्गावर चार ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला शिलालेख आहे. शिलालेखावर वातावरणाचा तसेच पायरीवर लेख असल्याने अक्षरांची झीज व पुसट झालेले आहे.

शिलालेखावर विसाजी पाटील यांचा उल्लेख

विसाजी पाटील यांनी विहीर बांधली किंवा ती पूर्ण केली आहे, असे शिलालेखात लिहिले आहे. शिलालेखात आलेले विसाजी पा. म्हणजे विसाजी पाटील, कदाचित गावचा प्रमुख काम करणारा मुख्य व्यक्ती आहे. विसाजी पाटील यांच्या प्रयत्नाने विहीर बांधून पूर्ण झाली. हा लेख 18 व्या शतकाच्या प्रारंभीचा आहे.

मराठ्यांच्या उत्कर्षकाळातील एक ग्रामीण सार्वजनिक कार्याचा पुरावा आहे. यात ‌‘विहीर‌’ (जलस्रोत) बांधण्याचा उल्लेख आहे. त्याकाळी विहिरी हे गावाच्या जीवनाचे केंद्रस्थान होते. विसाजी पाटील या व्यक्तीने गावासाठी जलसुविधा उपलब्ध करून दिली. हे एक पुण्याचे कार्य आहे, हे त्याकाळच्या दानशील आणि समाजाभिमुख संस्कृतीचे द्योतक आहे आणि हेच या शिलालेखाचे विशेष महत्त्व आहे
- अनिल दुधाणे, इतिहास अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT