सोलापूर : आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाचे तीव्र पडसाद आता थेट सोलापूरकरांच्या ताटात उमटू लागले आहेत. गॅस टंचाईच्या संकटानंतर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट अक्षरशः कोलमडले आहे. त्याचबरोबर हॉटेल व खाद्यपदार्थ व्यवसायालाही मोठा फटका बसला असून शहरातील वडापाव, भजी, मिसळ, शिक कढईपासून शाकाहारी थाळीपर्यंत सर्वच पदार्थांचे दर वाढले आहेत.
गॅस, खाद्यतेल दरवाढीमुळे सध्या सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसू लागली आहे. गॅसटंचाई आणि खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. परिणामी, शहरातील हॉटेलिंगसह नाश्त्याचे पदार्थ 20 ते 30 टक्क्यांनी महागले असून, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. घराघरातील स्वयंपाक खर्च वाढला आहे. गृहिणींना महिन्याचा खर्च सांभाळताना मोठी कसरत करावी लागत असून तळलेल्या पदार्थांवर मर्यादा आणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे हॉटेल चालकांनीही वाढत्या खर्चामुळे पदार्थांच्या दरात वाढ केली आहे. पूर्वी सर्वसामान्यांना सहज परवडणारा वडापाव आता महाग झाल्याने खवय्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शहरातील अनेक उपाहारगृहांनी शाकाहारी थाळीचे दर 20 ते 30 रुपयांनी वाढविले आहेत. भजी, समोसा, नाश्ता पदार्थ यांचे दरही वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चटका बसत आहे. दहा, बारा रूपयाला मिळणारा वडापाव आता 15 रूपयाला झाला आहे. शाकाहारी थाळी दोनशे पन्नास रूपये झाली आहे. हॉटेलमधील साधा चहा बंद झाला होऊन स्पेशल चहा, कोटी मिळत आहे. चॉयनिज गाड्यावरील प्रिय स्टार्टर पदार्थ सध्या मेनू कार्डमधून गायब झाले आहेत.
खाद्य तेलाची चढ्या दराने विक्री
खाद्य तेलाचे भाव प्रत्येक दिवसाला वाढत आहेत. प्रति एक किलोच्या पाकिटामागे 15 ते 20 रुपयांची तर 15 लिटर डब्यामागे 150 रुपये होलसेल बाजारात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात आणखी चढ्या दराने विक्री होत आहे. विविध कंपन्यांनसार प्रति दहा पाकिटांचा तेलाचा बॉक्स 1240 ते दोन हजार असा दर आहे. तर 15 लिटर तेलाच्या डब्यात देखील मोठ्या प्रमाणात दर वाढ झाली आहे.
गॅस टाकी लवकर मिळत नाही. काळ्या बाजारातून टाकी दोन हजार रुपयांपेक्षा जादा पैसे देऊन खरेदी कारावी लागत आहे. त्याशिवाय तेलाचे दर कमी, जास्त होत आहेत. त्यामुळे दर वाढवावे लागले आहे. दरवाढीचा मोठा फटका व्यापाराला बसला आहे.- जावेद शेख, वडा पाव व्यापारी