सोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये जनावरे वाहून गेली असून, प्रभावित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, अशी बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. या विषयावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
या मुद्द्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले. संबंधित अधिकाऱ्यांनी 165 गावांमध्ये अतिवृष्टी झाली असताना केवळ 165 जनावरे वाहून गेल्याची माहिती दिल्याने पालकमंत्री संतप्त झाले. तुम्ही बैठकीला आलात का फिरायला आलात? तुम्हाला तुमच्या खात्याची अचूक माहिती नाही का? अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कडक शब्दांत सुनावले. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत वाकाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत तक्रार मांडण्यात आली. संबंधित अधिकारी उपचारासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला. या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला यांची दांडी
तब्बल 9 महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक, अतिवृष्टी, महापूर त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे डिपीसी बैठकीला खो मिळाला. बुधवारी झालेल्या डिपीसी बैठकीस आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. विजयकुमार देशमुख, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. प्रणिती शिंदे, खा. ओमराजे निंबाळकर यांची अनुपस्थिती होती. समाधान अवताडे ऑनलाईनद्वारे बैठकीत सहभागी होत नंतर प्रत्यक्ष सभागृहातील बैठकीतही सहभागी झाले. तर आ. नारायण आबा पाटील हेही बैठकीस उशिरा आल्याने उशिरा आलेल्या आमदारांनी आता बोलायचे असे हसून म्हणत अवताडे आणि पाटील या दोन्ही आमदारांना आपले मुद्दे मांडण्यास अनुमती दिली.