राज्य लोकसेवा आयोग Pudhari Photo
सोलापूर

गट ‘ब’ अन् ‘क’च्या परीक्षा होणार स्वतंत्र

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा एकत्र घेण्यात येत होती. मात्र, या पुढील काळात गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा वेगवेगळी घेण्याचा निर्णय एमपीएससीमार्फत घेण्यात आला आहे. दोन्ही परीक्षा स्वंतत्र झाल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेसाठी दि. 19 जानेवारी, 2023 रोजी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करुन दोन्ही सेवेची संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विद्यार्थ्यांकडून विरोध होत असल्याने शासनाने स्वतंत्र परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट ब (अराजपत्रित) व गट क या सेवेतील विविध संवर्गाची वाढती संख्या, त्या अनुषंगाने परीक्षा देणार्‍या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षा 2023 च्या निकाल प्रक्रियेतील आलेल्या तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, त्या अनुषंगिक न्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब या बाबींचा विचार करून स्वतंत्रपणे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय

स्वतंत्र परीक्षा घेतल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संधी कमी झाल्या होत्या. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत होता. आता दोन्ही परीक्षा स्वतंत्र झाल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

एकूण 1813 जागांची भरती

महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही परीक्षांच्या जाहिराती एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गट ब साठी 480 पदाची व गट क साठी 1333 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT