उत्तर सोलापूर : यंदाच्यावर्षी होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर अखेरही शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. देवावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची फळ छाटणी केली. मात्र बागा सध्या पोंगा अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे.
यंदाच्यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्याने द्राक्ष बागा अडचणीत सापडल्या आहेत. द्राक्ष वेलींच्या गर्भधारणेच्या कालावधीत कडक ऊन असणे अपेक्षित असते. मात्र मे महिन्यातच पाऊस झाल्याने द्राक्ष वेलींची चांगल्या प्रमाणात गर्भधारणा झाली नाही. ती गर्भधारणा न झाल्यामुळे द्राक्षांना यंदा घड लागतील की नाही, याची साशंकता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तरीही देवावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या बागांची फळ छाटणी केली आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये ही फळ छाटणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. ऑक्टोबर महिन्यात तरी पाऊस संपेल, अशी भावना शेतकऱ्यांची होती. पण मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा अडचणीत सापडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या बागा पोंगा, दोडा व फुलोरा अवस्थांमध्ये आहेत. अशा अवस्थेमध्ये पाऊस पडल्याने द्राक्ष शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.