सोलापूर : राज्यात विविध 42 विभागांमध्ये सुमारे दोन लाख पदे रिक्त आहेत. शासनाने मेगाभरती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या भरतीची वाट पाहत आहेत. मात्र, शासनाकडून तसे कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या जवळपास 20 ते 30 टक्के उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने त्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी नियोजित वेळापत्रक जाहीर करते. परंतु, त्यानुसार भरती प्रक्रिया होत नाही. परिणामी, राज्यभरातील विविध 42 विभागांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत. ही पदे वेळेत भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे मनोबल खचत चालले आहे. त्यामुळे त्वरित मेगा भरती करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा करणार्या विद्यार्थ्यांतून होत आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे किती सकारात्मकपणे पाहते यावर विद्यार्थ्यांच्या बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.
शासनाच्या 42 विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. शासनाने दरवर्षी 50 हजार पदांची मेगाभरती करण्याचे जाहीर केले होते. त्यावर अतिरिक्त 150 ते 200 पदे वाढवून देण्याची मागणी लोकसेवा आयोग कर्मचारी संघटनेने शासनाकडे केली होती. शासनाने रिक्त पदे भरण्याची घोषणा करूनही 15 पेक्षा जास्त विभागात भरती केली नाही.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने मेगा भरतीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात मोठी भरती घेण्यात येत नाही. रिक्त पदाप्रमाणे भरती प्रक्रिया वेळेनुसार व्हावी. तसेच भरती प्रक्रिया पारदर्शक व गतीने झाल्यास लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.- प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन