पंढरपूर : देशाची बदनामी होणार नाही, अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्या आशा-आकांक्षा असतील त्या पूर्ण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ते आम्ही करू, काही उणिवा राहिल्या असतील, त्या दूर होतील. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून काही लोक, विशेषत: काही राजकीय पक्ष हे ज्या पध्दतीने कारभार करत आहेत, ते योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दसूर पाटी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे काही वेळ सारथ्यही केले. यावेळी ते दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सर्व सोयी-सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यावर्षी सर्व वाऱ्यांचा संख्यात्मक विक्रम तुटेल. जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा केल्या आहेत.